Thursday, September 04, 2025 08:59:50 AM

पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण: आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण  आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

पुणे: स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या डीएनए चाचणीसाठी त्याचे रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. तसेच, ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, न्यायालयाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनाक्रम : 26 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. आरोपी गाडेने बस कंडक्टर असल्याचे भासवून तिला सेवेत नसलेल्या बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी मोठ्या शोधमोहीमीनंतर त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली.

पोलिस तपास: डीएनए चाचणीसाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले.
बसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली, त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळाले.
आरोपीवर यापूर्वीही 6 गुन्हे दाखल, त्यातील 5 प्रकरणे महिलांशी संबंधित.
1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून आरोपीचा शोध घेण्यात आला.
13 पोलिस पथकांनी श्वान पथक व ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली.

सरकारी वकील आणि आरोपीचे वकील: सरकारी वकिलांनी आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. तर आरोपीच्या वकिलांनी हा संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला आहे.

महिला सुरक्षेची चिंता आणि सरकारी उपाययोजना: या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र सरकारने एसटी बसमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी पुढील उपाययोजना जाहीर केल्या आहेत:

सर्व एसटी बसमध्ये GPS, पॅनिक बटणे आणि CCTV बसवण्याचा निर्णय.
भंगार बसेसची विल्हेवाट लावण्याचे निर्देश.

या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


सम्बन्धित सामग्री